गडबोरी – वासेरा रस्त्यावर केली मलमपट्टी .
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो.नं. 9764271316
सिंदेवाही -: सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही अंतर्गत येत असलेला वासेरा – गडबोरी – सिंदेवाही या १० किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून गडबोरी ते वासेरा या ३ किलोमीटरच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असल्याने अखेर महेंद्र कोवले फ्रेंड्स क्लब वासेरा यांनी श्रमदानातून खड्डे बुजविण्याचे काम केले असल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
अलीकडे लोकसहभागातून श्रमदान ही व्याख्याच लुप्त होण्याच्या मार्गावर असून शारीरिक श्रम किंवा सार्वजनिक कामामध्ये श्रम देताना दिसत नाही. एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी काही व्यक्ती एकत्र येऊन काम करण्याची वृत्ती संपुष्टात आली असताना वासेरा येथील महेंद्र कोवले फ्रेंड्स क्लबचे वतीने एक पाऊल पुढे टाकण्यात आले. सिंदेवाही हा तालुक्याच्या ठिकाणाला जोडणारा वासेरा – गडबोरी – रामाळा हा वर्दळीचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने याबाबत ” दैनिक नवजीवन ने बातमी प्रकाशित केली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाने सदर रस्त्यावर केवळ गिट्टी टाकून खड्डे बुजविण्याचे काम केले. मात्र गिट्टीवरून मोटारसायकल या सारखी वाहने जात असताना अनेकांच्या मोटारसायकली घसरून पडल्या आहेत. तर काहीच्या मोटारसायकली पंक्चर झाल्या आहेत. याबाबत संबंधित विभागला गिट्टीवर मुरुम टाकण्यासाठी माहिती देऊन सुद्धा विभागाने मुरुम टाकले नाही. अखेर महेंद्र कोवले फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष सूरज कोडापे यांचे नेतृत्वात सदर खड्ड्यावर श्रमदानातून मुरुम टाकून पसरविण्यात आला आहे. यासाठी फ्रेंड्स क्लबचे संचालक तथा महालक्ष्मी इंडस्ट्रीज गडबोरी चे संचालक वैभव लिखितराव उज्वावकर, फ्रेंड्स क्लबचे संचालक महेंद्र कोवले, रमेश मेडीवार, घनश्याम मेडीवार, आकाश रणदिवे, सागर कुंभरे, इत्यादी उपस्थित राहून आणि स्वतः श्रमदान करून मुरुम पसरविण्याचे काम केले आहे. त्यामुळे परिसरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.


