श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीने प्लास्टिक वापर करू नये या बाबत वारंवार सूचना देऊनही सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानांवर छापे टाकून मंगळवारी प्लास्टिक जप्त करण्यात आले. मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या वतीने मागील अनेक दिवसांपासून सिंगल वापर प्लास्टिक पूर्णतः बंद करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात येत होत्या. तसेच जनजागृती करण्यात आली. परंतु प्लास्टिक वापर होत असल्याचे दिसून येत होते. यामुळे दिनांक 20/05/2025 रोजी मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांनी प्लास्टिक वापर करणाऱ्या दुकानांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. दुकानातून जाणारे प्लास्टिक शेवटी कचरा संकलनाद्वारे कचरा विलगीकरण साईटवर येऊन जमा होते. सदर ठिकाणी एकल वापर प्लास्टिकचा जास्त भार निर्माण होतो. कचरा संकलन ते विलगीकरण याचा एकूण खर्च वाढतो, मनुष्यबळ खर्ची पडते. तसेच पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांनी केले आहे.या मोहिमेअंतर्गत स्वतः मुख्याधिकारी राहुल कंकाळ, अध्यक्ष मा. श्री. भाष्कर नन्नावार, श्री. दिलीप रामटेके नगरसेवक, श्री. मयूर सुचक नगरसेवक, लेखाधिकारी सुरज गायकवाड, कर निरिक्षक राजेंद्र किरवले, स्थापत्य अभियंता मनोज आंबोरकर, स्वच्छता निरीक्षक अनिकेत मानकर, विनोद काटकर,संदीप कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सिंदेवाही-लोनवाही शहरातील किराणा व इतर होलसेल दुकान अशा ठिकाणी छापे टाकले. या शिवाय किरकोळ विक्रेत्यांकडूनही सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले. या मोहिमेत नगरपंचायत प्रशासनाने सिंगल यूज प्लास्टिक जप्त केले असून यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, ग्लास, पात्र, द्रोण व इतर साहित्यांचा समावेश होता.


