सिंदेवाही (प्रतिनिधी) – सिंदेवाही पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार विजय राठोड यांची बदली झाल्यानंतर त्यांना गुलदस्ता आणि शाल अर्पण करून कृतज्ञतेचा आणि सन्मानाचा भावपूर्ण निरोप देण्यात आला तसेच त्यांच्या पदावर नव्याने रुजू झालेले नवीन ठाणेदार श्री. कांचन पांडे साहेब यांचे सुद्धा शाल व गुलदस्ता देऊन अभिनंदन करण्यात आले. तत्कालीन ठाणेदार विजय राठोड साहेब यांच्या कार्यकाळात सिंदेवाही तालुक्याची शांतता अबाधित राहिली आणि गोरगरिबांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा सतत प्रयत्न त्यांनी केला.
या प्रसंगी चंद्रपूर ग्रामीण भाजयुमो सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक राहुल कावळे, बजरंग दल सिंदेवाही प्रखंड संयोजक कुणाल पेशंट्टीवार, शिवसेना शिंदे गटाचे ब्रह्मपुरी विधानसभा प्रमुख राकेश अलोणे, आणि भीम आर्मी तालुकाध्यक्ष अक्षय चहांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणेदार विजय राठोड यांची छबी केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे, तर संविधाननिष्ठ, सर्वसामान्यांचा कणखर आवाज म्हणून उभी राहिली. त्यांनी कधीही गुन्हेगारीला पाठीशी घातले नाही, तर गुन्हेगाराला रोखण्यासाठी तडफतेने आणि निर्भयतेने काम केले.
गैरवर्तन करणाऱ्यांना थेट कायद्याच्या चौकटीत आणणं आणि प्रत्येकाशी समान न्यायाने वागणं, हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. त्यांची बदली ही कार्यपद्धतीवर परिणाम करणारी ठरणार असली, तरी त्यांची ठसा उमटवणारी भूमिका सिंदेवाहीत कायम स्मरणात राहील.
कर्तव्यदक्षता, संवेदनशीलता आणि कायद्याबद्दलची निष्ठा यांचा आदर्श त्यांनी आपल्या वर्तणुकीतून घालून दिला. सिंदेवाहीवासीयांच्या मनात त्यांनी जो विश्वास निर्माण केला, हेच त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरतो नवीन ठाणेदार साहेब सुद्धा तीच भूमिका पार पडतील अशी आशा व्यक्त करण्यात आली.


